top of page

स्वाभाविक जीवनशैली: डिफॉल्टने नव्हे तर डिझाईनने जगा! / Live by Design, Not by Default: Reclaiming the 120-Year Life

*हे ईश्वरा सर्वांना*

*चांगली बुद्धी दे,*

*आरोग्य दे ll*


माणसाच आयुष्यमान - जीवन किती ?


सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात,

"माणूस एक दिवस या पृथ्वीतलावर अवतीर्ण होतो आणि एक दिवस तो या पृथ्वीतलावरून आंतर्धान पावतो या दोन दिवसांच्या मधला कालावधी म्हणजे माणसाचे जीवन."


जागतिक आकडेवारीनुसार माणसाचे जीवनमान हे सरासरी ७० ते ८० वर्षांचे आहे. भारतामध्ये ही सरासरी ६८ ते ७० वर्षांची आहे.


पण मानवी जीवनाच्या शास्त्रानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर मनुष्य प्राण्याला निसर्गाने बहाल केलेले आयुष्य किती?


शास्त्र असे सांगते की,

कोणत्याही प्राण्याचे आयुष्यमान तो प्राणी ज्या वयात वयात येतो त्याच्या ८ पट असते. वयात येणे याचा अर्थ प्रजननक्षम होणे. उदाहरणार्थ कुत्रा किंवा मांजर हे एक ते दीड या वयात वयात येतात. त्यांचे आयुर्मान हे आठ ते बारा वर्षांचे असते. गाय अथवा बैल हे दोन वर्ष ते तीन वर्षात वयात येतात. त्यांचे आयुष्य १६ ते २४ वर्षांचे असते. कासव दहा ते पन्नास या वयात प्रजननक्षम होते. कासवाचे आयुष्य हे शंभर ते साडेचारशे वर्षांचे असते. मनुष्य प्राणी १४ ते १५ या वयात वयात येतो. या हिशोबाने बघितल्यास मनुष्य प्राण्याचे शास्त्रसंमत वय हे ११२ ते १२० वर्षापर्यंत आहे.


मग आज आमचे भारतीय मनुष्याचे सरासरी आयुर्मान हे ६८ ते ७० वर्षांचे का?


तर आम्ही आमच्या चुकीच्या जीवनशैलीने आम्हाला परमेश्वराने दिलेला जीवन जगण्याचा १२० वर्षापर्यंतचा कालावधी हा ६८ ते ७० वर्षांपर्यंत आणून ठेवलेला आहे. योग्य जीवनशैली अंगीकारली तर १२० वर्षांचे धडधाकट आयुष्य जगणे सहज शक्य आहे.


तर आयुष्याचा कालावधी अवलंबून असतो तो जीवनशैलीवर. मानवी जीवनशैली विविध घटकांवर अवलंबून असते. ज्यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो

१. वैयक्तिक घटक: व्यक्तीचे आयुर्मान ठरते ते व्यक्तीचे शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य, सवयी, आवडीनिवडी आणि विचारसरणी यावर. आधुनिक जीवनशैलीत असंतुलित आहार, जेवणाच्या चुकीच्या वेळा, व्यायामाचा अभाव, आणि कार्य बाहुल्यामुळे ताण तणाव, चिंता यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

२. सामाजिक घटक: मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. व्यक्तिने व्यक्तीचे कुटुंबात, समाजात प्राप्त केलेले स्थान, कुटुंब मित्रपरिवार आणि सामाजिक परंपरा यांचा जीवनशैलीवर मोठा प्रभाव असतो.

३. आर्थिक घटक: व्यक्तीची आर्थिक स्थिती, उत्पन्नाचे स्त्रोत म्हणजे उत्पन्न कोणत्या मार्गाने येत आहे, खर्च करण्याची क्षमता व खर्च करण्याचे शहाणपण यावर व्यक्तीची जीवनशैली ठरते.

४. सांस्कृतिक घटक: व्यक्तीच्या सांस्कृतिक परंपरा म्हणजे कौटुंबिक परंपरा, चालीरीती आणि जीवनमूल्ये जीवनशैलीला आकार देतात.

५. शैक्षणिक घटक: शिक्षणाचा स्तर आणि ज्ञानाची व्याप्ती. सद्गुरु म्हणतात व्यक्तीच्या जीवनात जो काही गोंधळ निर्माण होतो त्याचे मूळ कारण आहे ते म्हणजे त्याचे अज्ञान.

६. पर्यावरणीय घटक: व्यक्ती ज्या भौगोलिक परिस्थितीत राहते त्या ठिकाणचे, आजूबाजूचे वातावरण, नैसर्गिक संसाधने यांचा जीवनशैलीवर मोठा परिणाम होतो. प्रदूषण, रासायनिक अन्नपदार्थ आणि नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास याचा मानवी जीवनावर व आरोग्य शैलीवर परिणाम होतो.


हे सर्व घटक एकत्रितपणे व्यक्तीची जीवनशैली म्हणजे व्यक्तीच्या सवयी, आचार, विचार, आहार, विहार यांना आकार देतात.

या सर्व गोष्टींचा साकल्याने हजारो वर्षांच्या अनुभवातून, चिंतनातून आमच्या पूर्वजांनी ऋषीमुनींच्या तत्त्वज्ञानाला प्रमाण मानून आमची जीवनशैली ठरविलेली होती. जिला आम्ही योगिक जीवनशैली म्हणतो. योगाच्या अष्टांगात व्यक्तीच्या शारीरिक मानसिक आणि अध्यात्मिक आरोग्याचा विचार केलेला आहे. योग म्हणजे केवळ आसने नव्हेत, तर अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, आणि समाधी होय. योगिक जीवनशैली ही केवळ अभ्यासा पूरती मर्यादित नसून ती दैनंदिन जीवनाचा भाग बनणे आवश्यक व गरजेचे आहे. अष्टांग योगाचे प्रत्येक अंग व्यक्तीच्या जीवनशैलीला पूर्णत्वाकडे घेऊन जाते.


आज काल आपण सहज म्हणतो की Lifestyle Diseases वाढलेले आहेत. Lifestyle diseases म्हणजे जीवनशैलीचे आजार. या जीवनशैलीच्या आजारात प्रामुख्याने समावेश होतो तो म्हणजे हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह आणि कॅन्सर यांचा. आजच्या काळातील सर्वात भयानक आणि सर्वात जास्त मृत्यूचे प्रमाण असलेला रोग कोणता आहे तर तो आहे ADR. ADR म्हणजे *Adverse Drug Reaction.* आज औषधांच्या दुष्परिणामामुळे सर्वात जास्त मृत्यू होतात. या सर्वांमधून मुक्तता मिळवायची असेल तर आपण सर्वांनी योग्य जीवनशैली अंगीकारली पाहिजे नां?


मग जर जीवनशैलीमुळे आजार निर्माण होण्याची शक्यता जास्त असेल तर आम्ही काय केले पाहिजे? तर आम्ही आमची जीवनशैली बदलली पाहिजे नां? आता प्रश्न निर्माण होतो ही जीवनशैली अंगीकारा वयाची म्हणजे काय करावयाचे?


असं बघा, आपण आजाराला इंग्रजीमध्ये Disease असे म्हणतो. Disease या शब्दाची फोड केली तर दोन शब्द मिळतात एक Dis आणि दुसरा Ease. याचा संयुक्त अर्थ लावला तर Disease म्हणजे Disorder in Ease होय. Disorder in Ease म्हणजे सहजतेचा लोप. सहजता लोप पावणे. जेव्हा आमच्या जीवनातील सहजता लोप पावते, सहजतेचा अभाव होतो तेव्हा आजारांचा प्रादुर्भाव होतो. लक्षात ठेवा Any disorder can be brought into order.


आरोग्य म्हणजे केवळ आजाराचा अभाव नाही. तर, आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक जीवनातील समतोल आणि सहजता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मानवी मनोबल आणि

पुन:र्स्थापित करण्याची मानवी क्षमता विलक्षण आहे. जेव्हा जेव्हा गोंधळ म्हणजेच disorder होते तेव्हा ती आराजकता आत्मपरीक्षण, आत्मनिश्चय, मानसिक स्थैर्य आणि विविध तंत्रांचा अवलंब करून order मध्ये आणता येते.


मग सहजता म्हणजे काय? तर निसर्गाचे निरीक्षण करा. निसर्ग बघा कसा सहज आहे. निसर्गातील सर्व प्रक्रिया सहज चाललेल्या असतात. निसर्गात कृत्रिमता नाही. आज आपल्या जीवनातील सहजता लोप पावली आहे. आमचे जीवन कृत्रिम झाले आहे. आमच्या वागण्यात, बोलण्यात, आचरणात, कृतीत नैसर्गिकता राहिलेली नाही. आम्ही अगदी सहज कोणाचे कौतुक करत नाही. आम्ही मनमोकळा आनंद देखील व्यक्त करत नाही. या सर्व कृत्रिमतेचा परिणाम आमच्या शारीरिक, मानसिक भावनिक आणि अध्यात्मिक आरोग्यावर होत असतो.


मानवी जीवन सुंदर आहे. जीवन सहज आहे पण जीवन सोपे नाही. सहज याचा अर्थ जन्माबरोबर येणे. जन्माला आलेला प्रत्येक जण मृत्यूपर्यंत जीवन जगतच असतो, पण आपलं हे जीवन जगणे हे बाय डिफॉल्ट चालू असते, वास्तविक पाहता जीवन हे बाय डिझाईन असलं पाहिजे. बाय डिझाईन जीवन जगणे सोपे नाही. सद्गुरु म्हणतात जीवन जगणे ही एक कला आहे. या जीवन जगण्याच्या कलेत तुम्ही पारंगत व्हा. ही जीवन जगण्याची कला जीवनविद्या शिकविते म्हणून जीवनविद्येचा अभ्यास करा. मनन, चिंतन करून जीवनविद्या दैनंदिन जीवनात आचरणात आणा.


आपण वर बघितलं की जीवनशैली अनेक घटकांवर अवलंबून असते. या घटकातील काही घटक हे आपल्या नियंत्रणा बाहेरचे असतात, पण बहुतांश घटक हे आपल्या नियंत्रणातील देखील असतात. या नियंत्रणातील घटकांचा विचार करून आम्ही आमची जीवनशैली ठरविणे हे देखील काही सोपे नाही.


आमची आजची जीवनशैली कशी आहे? आज अत्यंत स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतत धावपळ करावी लागत आहे. त्यातच आमच्या पारंपारिक संस्कृतीतील चांगल्या जीवन विषयक परंपरांचा विसर पडून आम्ही पाश्चिमात्य जीवनशैलीचे अंधानूकरण करत आहोत, त्यामुळे आमचा आहार, विहार, आचार, विचार यात अमुलाग्र बदल झाला आहे. प्रतिष्ठेच्या नावाखाली आम्ही नको त्या सवयींचे गुलाम झालेले आहोत. पैशाला अवास्तव महत्व प्राप्त झालेले आहे. या सर्व गोष्टींमुळे नैतिकतेचे, चांगुलपणाचे महत्त्व कमी झालेले आहे. या जीवनशैलीत बदल घडवून येणे आवश्यक आहे. याचा अर्थ आम्ही आजच्या जमान्यातील सर्व काही टाकून देऊन शतकापूर्वीची जीवनशैली अंगीकारणे असे नाही तर आधुनिकता आणि आमचे जीवन उद्दिष्ट यात योग्य तो समतोल राखून शहाणपणाने गोष्टी अंगीकारणे आहे.


जीवनशैलीत बदल घडवून आणायचा तर आम्हाला आरोग्य, आहार, आचार, विचार, उच्चार यात बदल घडवून आणावा लागेल. आणि असा बदल घडवून आणायचा असेल तर प्रथम आम्हास या सर्व गोष्टींचे ज्ञान घेण्यासाठी अभ्यास करायला लागेल. आजच्या परिस्थितीत आम्हाला कोणालाच अभ्यास करण्यासाठी इतका वेळ नाही. मग आम्ही काय करायचे?

तर जे शास्त्रानुमोदित व संतानुचरित आहे त्याचे अनुसरण करायला पाहिजे. अनुकरण,अनुसरण, आणि अनुमोदन हे कृती करण्याचे तीन प्रकार आहेत. अनुकरण कृतीचे केले जाते ज्याला आपण नक्कल असे संबोधतो. अनुसरण हे अनुकरणीय कृतीच्या पाठीमागच्या विचारांचे केले जाते. तर अनुमोदन हे चांगल्या कृतीचे आणि विचारांचे जे कालातीत आहे अशांचे केले जाते‌. एकंदर या पद्धतीने जीवनशैली ठरवायची म्हटले तर खूप अवघड गोष्ट आहे. मग आम्ही काय करावे?


आजचे युग हे टेक्नॉलॉजी चे युग आहे. आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगाने आम्हाला अनेक तंत्र दिलेली आहेत ज्याला आम्ही गॅजेट्स म्हणतो. या तंत्रांनी परिपूर्ण असलेली साधने आज आम्हाला उपलब्ध आहेत. ज्या साधनांचा वापर करून आम्ही सुख सोयी निर्माण करून जीवन जगत आहोत.

असं बघा, शास्त्र दोन प्रकारचे असते. एकाला आम्ही सायन्स म्हणजे अकॅडमिक सायन्स म्हणतो आणि दुसऱ्याला आम्ही ॲप्लाईड सायन्स म्हणतो. आपल्या घरातील अनेक आधुनिक साधने ही सायन्सच्या ठराविक तत्त्वांवर चालत असतात. आम्ही या साधनांचा वापर करताना आम्हाला त्या साधनांच्या पाठीमागच्या विज्ञानाचा विचार करण्याची गरज नसते. आम्ही साधन ज्या पद्धतीने वापरायला सांगितले आहे त्या पद्धतीने साधन वापरतो आणि त्या साधनांचा फायदा मिळवितो. उदाहरणार्थ आपल्या घरातील मिक्सर, टीव्ही, किंवा वॉशिंग मशीन हे विज्ञानाच्या कोणत्या तत्त्वावर चालते त्याच्याशी आम्हाला काहीच देणे घेणे नसते‌. साधन वापरायचे आणि त्याचा उपभोग घेऊन जीवन सुखकर करायचे एवढेच आम्हाला माहीत असते.

याच गोष्टींचा विचार करून आमच्या पूर्वजांनी संतांच्या तत्त्वज्ञानाचा ज्यांना सद्गुरु त्या त्या काळातील वैज्ञानिकच मानतात त्यांनी आमच्यासाठी जीवनशैलीतील तंत्र दिलेली आहेत. त्या तंत्रांचा अवलंब करून आम्ही आमची जीवनशैली सोपी आणि सहज करू शकतो, विज्ञान समजून घेण्याच्या भानगडीत न पडता. पुजा अर्चा, प्रार्थना, योग, ध्यान, व्यायाम ही ती तंत्रे आहेत. त्याचबरोबर आम्हाला जी जीवनमूल्ये सांगितलेली आहेत त्याचे आचरण करून आम्ही सहज जीवन कलात्मकतेने जगू शकतो.

सद्गुरूंनी खूप चिंतन करून काही तंत्रे आम्हाला बहाल केलेलीआहेत, ज्याला आपण साधना असे म्हणतो. या साधनां मधील सगळ्यात प्रभावी साधन म्हणजे विश्वप्रार्थना. विश्वप्रार्थना सतत नित्यनेमाने रिकाम्यावेळी म्हटल्यास आमचे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि अध्यात्मिक आरोग्य उत्तम तर राहील पण आमचे कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्य देखील उत्तम राहते. त्याचप्रमाणे भलं करची साधना, ही आमचे कौटुंबिक सामाजिक नातेसंबंध सुदृढ राखते. वैयक्तिक आरोग्यासाठी सद्गुरूंनी आम्हाला शरीर साधना दिलेली आहे. खरोखरच ही सगळी तंत्रे किती सोपी आहेत नां? जर ही साधने वापरून आमचे सर्वांचे जीवन आनंदी, सुखी आणि ऐश्वर्याचे होऊ शकते तर आम्ही प्रत्येक जण आनंदी, सुखी आणि ऐश्वर्यावान का होत नाही? तर सद्गुरु म्हणतात, अडचण ही आहे की हे सगळे करण्याची बुद्धी होण्याची. म्हणून सद्गुरु विश्वप्रार्थनेत सर्वप्रथम म्हणतात *हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे.*


मग हे संतांचे सद्गुरूंचे अनुसरण कधी करण्यास सुरुवात करावयाची? आमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे? संत तुकाराम म्हणतात, माणसाचे आयुष्य क्षणभंगुर आहे, म्हणजेच आमचे आयुष्य एक क्षणांचं आहे. कोणता क्षण शेवटचा क्षण असेल ते सांगता येणार नाही म्हणून या क्षणीच ही जीवनशैली अंगीकारायला सुरुवात करा. *देवाचीया द्वारी उभा क्षणभरी* म्हणजे क्षण म्हणजे आत्ताचा क्षण. प्रत्येक क्षण भरून काढा म्हणजे जीवनभर साधना करा. प्रत्येक क्षणी जागृत रहा. जागृत राहणे म्हणजे वर्तमान काळात जगणे. आणि त्याची सुरुवात आता या क्षणापासून करा.


शेवटचा मंत्र

Be natural,

Think natural,

Act natural,

Behave natural.

हेच आहे आपल्या चांगल्या जीवनशैलीचे रहस्य.

*तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार*


धन्यवाद.

सदगुरुनाथ महाराज की जय.

Jayant Joshi

Jeevanvidya Mission


.....




O Divine,

Grant everyone good intellect and health.


How Long is the Human Lifespan?


Sadguru Shri Vamanrao Pai once said:

A human takes birth on this Earth one day and disappears from it one day—

The time between these two days is what we call life.


According to global statistics, the average human lifespan is around 70 to 80 years. In India, it’s about 68 to 70 years.


But from a scientific and biological standpoint, how long is a human actually designed to live?


Scriptures tell us this:

The average lifespan of any species is roughly eight times the age at which it reaches reproductive maturity. For instance:


Dogs and Cats reach maturity at 1–1.5 years and live for 8–12 years.


Cows and Bulls mature at 2–3 years and live for 16–24 years.


Turtles reach maturity between 10–50 years and live up to 100–450 years.


Humans reach reproductive maturity at 14–15 years, so by that logic, the natural human lifespan should be 112–120 years.



Then Why Is the Average Lifespan Only 70?


Because of our flawed lifestyle.

We’ve reduced the God-gifted span of 120 years to 70 years through poor living habits. If we adopt a balanced and conscious lifestyle, living a healthy 120 years is entirely achievable.


What Determines Lifespan?


Lifestyle is everything. And lifestyle depends on multiple factors:


1. Personal Factors: Physical, mental, emotional health, habits, preferences, and mindset. Today’s imbalanced diet, irregular eating patterns, lack of exercise, and chronic stress deeply affect our health.



2. Social Factors: Humans are social beings. Family ties, friendships, and social traditions impact our way of living.



3. Economic Factors: Your income sources, how you earn, spend, and manage money influences your choices and lifestyle.



4. Cultural Factors: Family values, traditions, and cultural practices shape your way of life.



5. Educational Factors: Knowledge and awareness. Sadguru says, “All confusion in life stems from ignorance.”



6. Environmental Factors: The environment you live in, access to natural resources, pollution levels, and exposure to chemicals affect both lifestyle and health.




All of these factors influence your habits, actions, diet, and overall approach to life.


Our ancient sages had studied these dynamics deeply and created a lifestyle grounded in balance and self-awareness — what we now call the Yogic Lifestyle.


Yoga: Beyond Just Postures


Yoga is not just about physical poses.

Ashtanga Yoga includes:

Yama (ethics), Niyama (discipline), Asana (posture), Pranayama (breathing), Pratyahara (withdrawal), Dharana (concentration), Dhyana (meditation), and Samadhi (bliss).


Each limb of yoga contributes to a wholesome lifestyle. It's not just a practice — it's a way of living.


The Rise of Lifestyle Diseases


Diseases like heart conditions, high blood pressure, diabetes, and cancer are lifestyle-induced.

But the leading cause of death today is ADR – Adverse Drug Reaction.

We must take this seriously. The solution? Fix the lifestyle.


If diseases are born out of lifestyle, then the cure lies in changing that lifestyle.


Understanding “Disease”


Break the word "Disease":

Dis + Ease = Loss of Ease

When natural ease is lost, disease begins.

But remember: Any disorder can be brought back into order.


True Health Is Not Just Absence of Illness


Health is the balance and ease of your body, mind, emotions, and social life.

The good news?

Humans have incredible capacity to rebuild. Disorder can be reversed through self-reflection, mental resolve, and the right techniques.


Rediscovering Ease — The Natural Way


Observe nature — it flows with ease. There’s no artificiality.

But our lives today are filled with pretenses. We don’t even express appreciation naturally anymore. This unnatural way of living harms our physical, emotional, and spiritual health.


Life is beautiful. Life is meant to be effortless, not necessarily easy.

“Sahaj” (ease) means what comes with birth.

Everyone lives, but mostly by default, not by design.

Sadguru says, “Living is an art. Learn this art.”


This is what Jeevanvidya teaches — the art of living.


So study Jeevanvidya. Reflect. Meditate. And live it daily.


What Needs to Change?


Yes, not all factors are under our control — but many are.

We must make conscious choices about our lifestyle.


Today’s fast-paced competitive life and blind imitation of the West has caused us to abandon our ancient wisdom. Our diet, conduct, and thoughts have all shifted drastically.


We’ve become slaves to bad habits and money, losing our ethical and spiritual values.


We don’t need to abandon modernity — but we must blend wisdom with modern life.


Thank you.

Sadguru maharaj ki Jai.

Jayant Joshi

Jeevanvidya Mission

 
 
 

Recent Posts

See All
Mind: Your Greatest Ally or Your Toughest Enemy?

Bhagavad Gita – Chapter 6, Verse 5 (Sanskrit with Meaning) Verse 6.5: उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो...

 
 
 
नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मीवल्लभ तया जवळी / The Simple Way to Bring God into Your Life Daily

ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणतात, नित्य नियमाने भगवंताचे नामस्मरण करतो अशी व्यक्ती आढळणे अत्यंत दुर्मिळ. जी व्यक्ती नित्यनेमाने भगवंताचे...

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page